नवी दिल्ली - काश्मीरमधील एका गावातील सरपंचांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अजय पंडिता असे या सरपंचांचे नाव आहे. दरम्यान, माझे वडील आयुष्यात कुणाला घाबरले नाहीत. ना मी कुणाला घाबरते, अशा शब्दात अजय पंडिता यांच्या मुलीने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच तिने शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अजय पंडिता यांची कन्या शीन पंडिता म्हणाली की, 'माझ्या वडिलांनी संरक्षण मागितले होते. काश्मीरसारख्या प्रदेशात सरपंच बनल्यानंतर त्यांना संरक्षण मिळणे आवश्यक होते. मात्र जी गोष्ट त्यांना मिळणायला हवी होती ती त्यांना मागावी लागली. मात्र तरीही त्यांना संरक्षण मिळाले नाही, अशा शब्दांत तिने स्थानिक शासन, प्रशासन यंत्रणेबाबत संताप व्यक्त केला.
माझ्या वडिलांचे जेवढे आपल्या गावावर प्रेम होते तेवढेच भारतावर होते. म्हणूनच त्यांनी आपल्या नावासमोर भारतीय जोडले होते. मात्र त्यांना मागूनही संरक्षण मिळाले नाही. त्यामुळे अखेर ही घटना घडली. माझे वडील हे कुणालाही घाबरत नव्हते. तशीच मीसुद्धा कुणालाही घाबरत नाही, असेही तिने यावेळी ठणकावून सांगितले.