इम्फाळ : लोकसभा निवडणुकांना प्रारंभ होण्यास दोन आठवड्यांहून कमी कालावधी उरला असला तरी अद्याप मणिपूरमध्ये निवडणूक प्रचाराचे वातावरणच तयार झालेले नाही. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राजकीय पक्षांचे फलक, मोठ्या प्रचारसभा, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची लगबग अशी दृश्ये पाहायला मिळत नाहीत.
लोकांनी आवर्जून मतदान करावे असे आवाहन करणारे फलक स्थानिक प्रशासनाने अनेक ठिकाणी लावले आहेत. या राज्यात निवडणुका असल्याचे दर्शविणारी तेवढी एकच खूण सध्या तिथे दिसत आहे. सर्वच महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मणिपूरचा दौरा करण्याचे किंवा तिथे प्रचार करण्याचे टाळले आहे. भाजपचे स्टार प्रचारक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, काँग्रेसचे स्टार प्रचारक सोनिया गांधी, राहुल गांधी अशांची एकही प्रचारसभा मणिपूरमध्ये अद्याप झालेली नाही. (वृत्तसंस्था)