हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्याला देवभूमी म्हटले जाते. कुल्लूची संस्कृती आणि परंपरा देशविदेशातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. येथे देवदेवतांप्रति आस्था बाळगली जाते. तसेच देवाचा आदेश हा सर्वोपरि मानला जातो.
मनालीमधील गौशाल आणि आजूबाजूच्या आठ गावांमध्ये आता पुढच्या दीड महिन्यापर्यंत मौन आणि शांतता दिसून येणार आहे. येथे कसल्याही प्रकारचा मानवनिर्मित आवाज ऐकू येणार नाही. या गावांमध्ये या काळात टीव्ही सुरू होणार नाहीत, ना मंदिराची घंटी वाजणार नाही, तसेच मोबाईलची रिंगही वाजणार नाही. या काळात येथे येणाऱ्या पर्यटकांनाही या नियमाचं पालन करावं लागणार आहे. ऐकायला काहीशी अजब बाब असली, तरी ही गोष्ट खरी आहे.
मनालीमधील उझी खोऱ्यातील नऊ गावांमध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या देव परंपरेचं आजही पालन केलं जातं. ऐतिहासिक गाव गौशाल येथे पुन्हा एकदा मकर संक्रांतीनंतर टीव्ही बंद करण्यात आला आहे. तसेच मोबाईल सायलेंड मोडवर टाकण्यात आले आहेत. तसेच कुठलीही व्यक्ती मोठ्या आवाजामध्ये बोलू शकत नाही. त्याशिवाय शेतीवाडीची कामंही होणार नाहीत. मंदिरांमध्ये पूजेशिवाय इतर घंटा बांधण्यात आल्या आहेत. हा आदेश येथील आराध्य देवता गौतम ऋषी, व्यास ऋषी आणि नागदेवतेकडून आलेला आहे. तसेच दीड महिन्यापर्यंत ग्रामस्थ या आदेशाचे पालन करणार आहेत. मनालीमधील गौशाल, कोठी, सोलंग, पलचान, रुआड, कुलंग, नशनाग, बुरुआ आणि मझाच गावांमध्ये देव परंपरा पाळली जाते. तरुण पिढीसुद्धा या परंपरांचं पालन करत आहेत.