रांची (झारखंड) : हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानंतर निवडणूक प्रचारातून अंग काढून घेणारे विद्यमान खासदार जयंत सिन्हा यांना भाजपने सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. पक्षाने हजारीबाग मतदारसंघातून सिन्हा यांच्याऐवजी मनीष जयस्वाल यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे नाराज सिन्हा यांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे.
सिन्हा हे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. ‘पक्षाने मनीष जयस्वाल यांना हजारीबाग मतदारसंघातून उमेदवार घोषित केल्यापासून तुम्ही संघटनात्मक कामात आणि निवडणूक प्रचारात रस घेत नाही. मतदानाचा हक्क बजावणेही तुम्हाला योग्य वाटले नाही. तुमच्या आचरणामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे,’ असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आदित्य साहू यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे. या कारवाईबाबत भाजप नेते आदित्य साहू यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘जयंत सिन्हा यांच्या प्रतिक्रियेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल.’