महाराजगंज - शेजारील देश नेपाळचे (Nepale) विमान भारताच्या हद्दीत (Indian Border) घुसल्याची घटना समोर आली आहे. हे विमाननेपाळला लागून असलेल्या बिहारच्या महाराजगंज जिल्ह्यातील सोनौली शहरावर बराच वेळ घिरट्या घालत होते, असेही बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील भैरव गौतम बुद्ध विमानतळावर लँडिंग दरम्यान हे विमान भारतीय सीमेत 400 मीटर आत घुसले होते.
ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घड्याल्याचे सांगितले जाते. भैरहवा स्थानकाचे अधीक्षक दर्शन ढिमरे म्हणाले, खराब हवामान आणि लँडिंग सिग्नल न मिळाल्याने अशी समस्या निर्माण होते. जेव्हा उत्तरेकडील भागात हवामान खराब होते, तेव्हा विमान उतरण्यासाठी दक्षिणेकडून यावे लागते. त्यामुळे विमानाला सुरक्षितपणे फिरविण्यासाठी, भारतीय सीमेत जावे लागते.
यासंदर्भात बोलताना नेपाळ एयरपोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की भैरहवा एअरपोर्टवर सुरक्षित लँडिंग करण्यासाठी विमानाला जवळपास 4 किमी जागेची आवश्यकता असते. दक्षिण दिशेला केवळ तीन किलोमीटर अंतरावरच भारताची सीमा आहे. यामुळे मजबुरीने विमानाला भारतीय सीमेत प्रवेश करावा लागतो. अशा वेळी वैमानिक गोरखपूर, वाराणसी एअरपोर्टच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी घेऊन भारताच्या हद्दीत प्रवेश करतात.