कारागृहात एनडीपीएस कायद्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका तरुणीने कारागृहाची भिंत पार करून पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील कारागृहात घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, या तरुणीने कपड्यांपासून दोरी तयार करत तुरुंगाची भिंत पार केली. तिला पकडण्यासाठी पोलिसांच्या १२ पथकांकडून वेगवेगळ्या भागांमध्ये शोध घेतला जात आहे. तसेच ती नेपाळमध्ये पळून जाण्याची शक्यता विचारात घेऊन सीमा सुरक्षा दलासह मिळून पोलीस सीमेवर तपासणी करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, शहरातील वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तरुणीला शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पोलीस दुकानांसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत आहे. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फरार तरुणी लिंक रोड क्षेत्रात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसली आहे. तसेच ती तिथून पांडे गावाकडे पळून जाताना दिसत आहे.
पिथौरागडचे पोलीस अधिकक्ष लोकेश्वर सिंह यांनी सांगितले की, या तरुणीला पकडण्यासाठी पोलिसांची मदत करणाऱ्याला १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. त्यांनी जनतेला या तरुणीला पकडण्यासाठी मदत करण्याचंही आवाहन केलं आहे. फरार तरुणी ही नेपाळमधील दुमलिंग गावातील रहिवासी अनुष्का उर्फ आकृती आहे. तिला अडीच वर्षांपूर्वी धारचुला येथे सीमा सुरक्षा दलाने दीड किलो चरस सह अटक केली होती. विचाराधीन कैदी असल्याने तिले पिथौरागड येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.