काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून नेपाळी नागरिकांकडे असलेल्या भारतीय चलनातील पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.प्रचंड यांनी मोदी यांच्याशी चर्चा केली. प्रचंड यांनी मोदींना सांगितले की, नेपाळी नागरिकांकडे भारतीय चलनातील हजार-पाचशेच्या नोटांचा मोठा साठा आहे. या नोटा बंद करण्यात आल्यामुळे सामान्य नेपाळी लोक अडचणीत आले आहेत. त्यांना नोटा बदलून देण्याची काही तरी व्यवस्था करावी. भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या नेपाळींची संख्याही मोठी आहे. नेपाळी लोक उपचारासाठी भारतात येतात. दैनंदिन वस्तूंची खरेदीही ते भारतात येऊनच करतात. शिवाय आमच्या देशात भारतीय पर्यटकांकडून भारतीय चलन स्वीकारले जाते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय चलनातील पैसा आहे. सीमापार व्यापार करणाऱ्यांकडेही भारतीय चलनातील पैसा आहे. हा सर्व पैसा आता निरर्थक ठरला आहे. फेडरेशन आॅफ नेपालीज चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने म्हटले की, नेपाळी नागरिकांकडील भारतीय चलनातील पैसा बदलून मिळाला नाही, तर हजारो लोकांना आयुष्यभराची बचत गमवावी लागू शकते. नेपाळमध्ये ३३.६ दशलक्ष रुपये हजार-पाचशेच्या नोटांत आहेत, असे नेपाळ राष्ट्र बँकेने म्हटले आहे.
नेपाळच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन
By admin | Published: November 16, 2016 1:20 AM