तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरसने पुन्हा डोके वर काढले असून एक रुग्ण आढळल्याचे आरोग्य मंत्री के के शैलजा यांनी मान्य केले आहे. यामुळे केरळसह दिल्लीतही भीतीचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. निपाह हा व्हायरस वटवाघळांपासून पसरतो.
केरळच्या आरोग्य मंत्री शैलजा यांनी 23 वर्षांचा एर्नाकुलम येथे राहणाऱ्या तरुणाला निपाहची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यातील व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटमध्ये त्याची रक्तचाचणी दोषी आढळली आहे. तसेच राज्यभरात 86 संशयित रुग्ण दाखल झाले असून यामध्ये दोन नर्सचाही समावेश आहे. या रुग्णांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. एर्नाकुलम मेडिकल कॉलेजने या रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड तयार केला आहे. 2018 मध्येही निपाह व्हायरसमुळे केरळात 16 जणांचा मृत्यू झाला होता. तर 750 हून अधिक रुग्णांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते.
आरोग्य मंत्री शैलजा यांनी सोशल मिडीयावर सांगितले की, केरळमध्ये सर्व गरजेची औषधे ठेवण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आरोग्य विभाग सक्षम आहे. तसेच मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
व्हायरस कसा पसरतोहा व्हायरस वटवाघळांपासून पसरतो. वटवाघळाने जर कोणत्या फळाचा चावा घेतलेला असल्यास आणि जर ते फळ किंवा भाजी माणसाने किंवा जनावराने खाल्ल्यास त्याला निपाहची लागण होते. या व्हायरसची लक्षणे म्हणजे तीव्र डोकेदुखी आणि ताप असते. जर या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यू होण्याची शक्यता ही 74.5 टक्के असते.
21 वर्षांपूर्वी निपाहचा शोधडब्ल्यूएचओनुसार निपाह या व्हायरसचा शोध 1998 मध्ये मलेशियात लागला होता. तेथील सुंगई निपाह गावातील लोकांना पहिल्यांदा लागण झाली होती. यावरून या व्हायरसचे नाव निपाह असे पडले. तेव्हा डुक्कर पाळणाऱ्या शेतकऱ्यांना लागण झाली होती. यानंतर पाळीव जनावरांनाही लागण झाली होती.