- एस. के. गुप्तानवी दिल्ली : मेडिकल, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी स्थापन करण्यात आलेल्या टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नेट, जेईई परीक्षा देणाऱ्यांसाठी दुहेरी भेट दिली आहे. ही परीक्षा पूर्वीच्या तुलनेत तीनपट अधिक शहरात आयोजित करण्यात आली आहे. तर, फीमध्ये २० ते ५० टक्के कपात करण्यात आली आहे. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ही परीक्षा कॉम्युटरवर होणार आहे. त्यामुळे कागदाचा उपयोग शून्यावर आला आहे. याचा लाभ परीक्षार्थींना दिला जाणार आहे. पूर्वी यूजीसी नेट परीक्षा ९१ शहरांत होत होती. आता ही परीक्षा २७३ शहरात होणार आहे.एनटीएचे महासंचालक जोशी यांनी सांगितले की, या केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन मोफत टेस्ट सीरिजचे आयोजन ८ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. यासाठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे टेस्ट घेण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांना कॉम्युटर बेस्ड परीक्षेचा अनुभवही येईल. याशिवाय ७ सप्टेंबर रोजी एनटीएच्या वेबसाईटवर आॅनलाइन टेस्ट सीरिज अपलोड करण्यात येईल. विद्यार्थी घरी बसूनही कॉम्युटरवरील परिक्षेचा अभ्यास करु शकतील. यूजीसी नेट परीक्षेची फी सामान्य श्रेणीसाठी १००० रुपयांवरुन कमी करुन ८०० रुपये करण्यात आली आहे. नॉन क्रिमिलेअर, ओबीसीसाठी ४०० रुपये, एससी, एसटी, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठी २०० रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, जेईई मुख्य परीक्षा जवळपास ८० टक्के परीक्षार्थी पेन पेपरने देत होते. याचे परीक्षा शुल्क १००० रुपये होते. कॉम्युटर बेस्ड परीक्षेचे शुल्क सामान्य आणि ओबीसी श्रेणीच्या विद्यार्थ्यांसाठी एका पेपरसाठी ५०० आणि दोन पेपरसाठी ९०० निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थीनींसाठी एका पेपरचे शुल्क २५० आणि दोन्ही पेपरचे शुल्क ४५० ठेवण्यात आले आहे.मॉक टेस्टसाठी असे करा रजिस्ट्रेशनसर्वात प्रथम एनटीएडॉटएसीडॉटइन वेबसाइटवर क्लिक करा. त्यानंतर ‘स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर मॉक टेस्ट’वर क्लिक करुन आपली माहिती भरा. आपला फोटो आणि आयडी प्रूफ अपलोड केल्यानंतर टेस्ट सेंटरची माहिती येईल. यातील पाच टेस्ट सेंटर निवडायचे आहेत. त्यानंतर मॉक टेस्ट देण्याची तारीख येईल. ज्या तारखेला आपण टेस्ट देऊ इच्छितात त्याची निवड करावी आणि नोंदणी करावी. त्यानंतर मोबाईल आणि ईमेलवर मॉक टेस्ट देण्याची सूचना मिळेल.
नेट, जेईईच्या परीक्षा फीमध्ये केली २0 ते ५0 टक्के कपात; ८ सप्टेंबरला होणार कॉम्प्यूटरबेस्ड मोफत टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 2:40 AM