नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अंदाजे ७० वर्षांपूर्वी झालेला रहस्यमय मृत्यू किंवा त्यांच्या आकस्मिकपणे बेपत्ता होण्याशी संबंधित असलेले सर्व गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक करण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी कॅबिनेट सचिव अजित सेठ यांच्या अध्यक्षतेखाली एक आंतर-मंत्रालयीन कमिटी स्थापन केली आहे.गृह आणि परराष्ट्र मंत्रालय, रिसर्च अँड अॅनालिसिस विंग व इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या या कमिटीची पहिली बैठक गुरुवारी होण्याची शक्यता आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.नेताजींच्या गूढ मृत्यूशी संबंधित असलेल्या जवळपास ९० फाईल्स अद्यापही सार्वजनिक झालेल्या नाहीत. नेताजींचे नातू सूर्यकुमार बोस यांनी मंगळवारी बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि १८ आॅगस्ट १९४५ रोजी नेताजींचा झालेला मृत्यू अथवा त्यांच्या बेपत्ता होण्यापासूनच्या सर्व घटनांशी संबंधित असलेल्या सर्व फाईल्स सार्वजनिक करण्याची विनंती केली होती.(लोकमत न्यूज नेटवर्क)
नेताजी पाळतप्रकरणी आंतर-मंत्रालय समिती
By admin | Published: April 16, 2015 1:42 AM