नवी दिल्ली - देशाचे महान स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या जयंती आधी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती यावर्षीपासून "पराक्रम दिवस" म्हणून साजरा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा शुभारंभ 23 जानेवारीला कोलकाता येथील ऐतिहासिक विक्टोरिया मेमोरियल हॉल येथून होणार आहे.
संस्कृती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "नेताजींच्या नि: स्वार्थ भावनेचा आणि देशासाठी त्यांनी केलेल्या नि: स्वार्थ सेवेचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने त्यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारीला "पराक्रम दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील जनता, विशेषत: तरुणांना, प्रतिकूल परिस्थितीत नेताजींच्या जीवनातून प्रेरणा मिळेल आणि त्यांच्यात देशप्रेम आणि धैर्याची भावना असेल." केंद्र सरकारकडून मंगळवारी दुपारी 3 वाजता नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली जाणार आहे. केंद्र सरकारकडून पराक्रम दिवस साजरा करण्याबाबत सूचना आणि कार्यपद्धती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये झाला आणि देशाला एक नेतृत्व मिळालं. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले एक महत्त्वाचे नेते होते. इंग्रजांना देशातून पळवून लावण्यात त्यांनी त्यांच्या सेनेसोबत फार महत्त्वाची कामगिरी केली. दुसऱ्या महायुध्दात भारतीय सेनेच्या आझाद हिंद फौजेच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ‘तुम मुझे खुन दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ या नेताजींच्या घोषणेमुळे अनेक तरुण स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. आजही या शब्दांमुळे मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत होते. त्यांनी पुर्व आशियात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचं नेतृत्व केलं आणि जर्मनीत आझाद हिंद रेडिओ स्टेशन सुरु केलं. स्वामी विवेकानंदांच्या वैश्विक बंधुभावाच्या शिकवणीवर त्यांचा विश्वास होता.
शालेय आणि विद्यापिठातील शिक्षणादरम्यान ते फार हुशार होते आणि त्यांनी नेहमी वरचा क्रमांक मिळवला. 1918 ला ते तत्त्वज्ञान विषयात बी.ए.मध्ये फर्स्ट क्लासने पदवीधर झाले. 1920 मध्ये ते इंग्लंडमध्ये इंडीयन सिव्हिल सर्व्हिस परिक्षा पास झाले मात्र नंतर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी 1921 ला आपल्या या नोकरीचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारला पत्र लिहिलं होतं. या पत्रात ममतांनी मोदी सरकारकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित सर्व महत्वाचे दस्तऐवज सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.
ममता यांनी वैयक्तिकपणे मला असे वाटते, की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी काहीही महत्वाचे कार्य केलेले नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी ही राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, यासाठी मी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे आणि ही माझी मागणी आहे असं म्हटलं होतं. याच बरोबर अनिवासी भारतीयांसह देशातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते, की नेताजींच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 23 जानेवारीला दुपारी 12:15 वाजता सर्वांनी शंख नाद करावा, असं देखील ममता म्हणाल्या.