नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित सर्व गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्याची प्रक्रिया केंद्र सरकार पुढील वर्षी २३ जानेवारी या त्यांच्या जयंतीदिनापासून सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केली. मोदी यांनी आपल्या निवासस्थानी नेताजींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. इतिहास दडपण्याची काहीएक गरज नाही, असेही मोदी यांनी यावेळी जाहीर केले. ‘अन्य देशांच्या सरकारांनाही त्यांच्याजवळ असलेल्या नेताजींशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्याची विनंती मी करणार आहे. त्यासाठी मी त्यांना पत्र लिहिणार आणि विदेशी नेत्यांशी भेटतानाही हा मुद्दा उपस्थित करणार आहे. डिसेंबरमध्ये आपल्या रशिया दौऱ्यापासून त्याची सुरुवात होईल,’ असे मोदी यांनी म्हटले आहे. नेताजींशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्याचा हा मुद्दा गेल्या सात दशकांपासून प्रलंबित आहे. मोदी यांनी बुधवारी नेताजींच्या कुटुंबातील ३५ सदस्यांची आपल्या निवासस्थानी भेट घेतेवेळी फाईल्स सार्वजनिक करण्याबाबतची घोषणा केली. यावेळी त्यांनी नेताजींच्या कुटुंबीयांसमवेत दोन तास चर्चा केली.दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये नेताजींचा पुतळा संग्रहालय स्थापन करण्यात येईल, असेही मोदी यांनी नेताजींच्या कुटुंबीयांना सांगितले. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आयएनएमध्ये सामील झालेल्या सैनिकांना स्वातंत्र्य संग्राम सेनानीचा दर्जा देण्याच्या मागणीला मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती यावेळी उपस्थित असलेले जी. डी. बक्षी यांनी सांगितले. नेताजींशी संबंधित किमान १६० फाईल्स केंद्र सरकारकडे आहेत. त्या सार्वजनिक झाल्यास १९४५ मध्ये नेताजींच्या रहस्यमयरीत्या बेपत्ता होण्यामागचे कारण उघड होण्याची शक्यता आहे. ‘मला तुमच्याच कुटुंबाचा भाग समजा, असे मी नेताजींच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यांनी मला काही सूचना केल्या. आपल्या निवासस्थानी त्यांचे स्वागत करता आले हे माझे अहोभाग्य,’ असे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नेताजींच्या फाईल्स जानेवारीत उघड करणार
By admin | Published: October 14, 2015 11:34 PM