नवी दिल्ली - औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले 16 मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. 'स्थलांतरीत मजुरांना मरण्यासाठी सोडलं आहे. देशाच्या इतिहासात असे असंवेदनशील सरकार पाहिले नाही' असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यशवंत सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 'सरकारने स्थलांतरीत मजुरांना मरण्यासाठी सोडलं आहे. केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली आहे. देशाच्या इतिहासात असे असंवेदनशील सरकार पाहिलेले नाही. सरकारच्या क्रूरतेला जनता माफ करणार नाही' असं सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रेल्वे अपघातात मजूर भाऊ-बहिणींच्या मृत्यूच्या बातमीनं मी दुःखी आहे. राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांबरोबर होत असलेल्या व्यवहारावर आपल्याला लाज वाटली पाहिजे. मृत मजुरांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. आवश्यक मदत केली जाईल, असंही आश्वासन मोदींनी दिलं आहे. त्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीसुद्धा ट्विट केलं आहे. आज पहाटे नांदेड डिव्हिजनच्या बदनापूर व करमाड स्टेशनजवळ काही कामगारांचा मालगाडीच्या खाली येऊन अपघात झाल्याची दुःखद बातमी समजली आहे. बचावकार्य सुरू असून, रेल्वे अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले आहेत. मृतांच्या आत्म्यांना ईश्वर शांती देवो, यासाठी प्रार्थना करतो, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : "गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच कोरोना पसरला"
CoronaVirus News : कोरोनाची लढाई जिंकले, 13 लाख लोक बरे होऊन घरी परतले
CoronaVirus News : कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर चाचणी केल्याचा गुजरात सरकारचा दावा
CoronaVirus News : दारूमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, 'या' सरकारने सुरू केली 'ऑनलाईन टोकन' व्यवस्था
CoronaVirus News : धक्कादायक! डोळ्यांमधूनही होतो कोरोनाचा संसर्ग; संशोधकांचा दावा