पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या '15 लाखां'च्या वक्तव्यावर खुलासा केल्यानंतर राहुल गांधींसह अनेकांनी टीका केल्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युटर्न घेतला आहे. मोदी किंवा 15 लाखांच्या आश्वासनाबाबत आपण काही बोललोच नसल्याचे ते म्हणाले. तसेच ती मुलाखत मराठीमध्ये होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मराठी कधीपासून यायला लागली असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान हे विधान केले होते. यावेळी त्यांनी मोदी यांनी 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या 15 लाख रुपयांच्या आश्वासनामागची गोष्ट सांगितली होती. 'प्रत्येक देशवासीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील', असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते. यावर बोलताना गडकरी म्हणाले होते की, 'आम्ही सत्तेत कधीही येऊ शकणार नाही, यावर आम्हाला पूर्ण विश्वास होता. यासाठी आम्हाला मोठ-मोठी आश्वासनं देण्याचा सल्ला देण्यात आला होता.'
मात्र, आज राहुल गांधी यांनी गडकरी यांच्या वक्तव्यावर 'गडकरी तुम्ही खरे बोलला', अशी टीका केल्याने गडकरींनी यावर पलटवार केला आहे. आपण असे कधी बोललोच नसल्याचे त्यांनी स्पष्ट करतानाच तो कार्यक्रम मराठीतून होता. राहुल गांधी यांना कधीपासून मराठी कळायला लागले. मला याचेच जास्त आश्चर्य वाटत आहे अशी खोचक टीका त्यांनी केली.