नवी दिल्ली : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते मणीशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुस्लिमांना कुत्र्याचे पिल्लू म्हणणारी व्यक्ती एक दिवस देशाचे पंतप्रधान होईल, असा विचार सुद्धा केला नव्हता, असे म्हणत मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना मणीशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 'मुस्लिमांना कुत्र्याचे पिल्लू समजणारा एखादा मुख्यमंत्री पंतप्रधानपदी येईल' असा मी 2014 पूर्वी मी विचारसुद्धा केला नव्हता, असे मणीशंकर यांनी म्हटले आहे. 2002 मध्ये गुजरात दंगलीच्यावेळी मुस्लिमांना जीव गमवावा लागला, त्यावेळी नरेंद्र मोदींना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले होते की, एक कुत्र्याचे पिल्लू सुद्धा गाडी खाली आले, तर माझ्या हृदयाला धक्का बसतो. मात्र, दंगलीच्या 24 दिवसांपर्यंत मुस्लिमांच्या कॅम्पमध्ये प्रवेश केला नाही, अशी व्यक्ती असे बोलूचं कशी शकते, असा सवाल मणीशंकर अय्यर यांनी केला. याचबरोबर, ते म्हणाले अहमदाबाद येथील मस्जिदमध्ये नरेंद्र मोदी ज्यावेळी पोहोचले होते, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आले होते. त्यामुळे त्यांना त्याठिकाणी जाणे गरजेचेच होते.दरम्यान, याआधीही मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना असंसदीय अशा 'नीच' या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे मणिशंकर अय्यर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
'अशी' व्यक्ती पंतप्रधानपदी येईल असं वाटलंही नव्हतं - अय्यर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 5:52 PM