नवी दिल्ली - प्रेम म्हणजे प्रेम असतं मात्र ते व्यक्त करण्यासाठी शहरांच्या गर्दीत अनेकांना मोकळा श्वास घेण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकदा प्रेमीयुगल एकांत शोधण्यासाठी निर्जनस्थळी बसल्याचं दिसून येतं. मात्र सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका फोटोची दखल खुद्द रेल्वे मंत्रालयाला घेणं भाग पडलं आहे.
रेल्वे ट्रॅकचे जाळे देशभरात सगळीकडे पसरलेलं आहे. अनेकदा घाईघाईमध्ये लोक रेल्वे ट्रॅक ओलांडून प्रवास करतात. याचे अनेक अपघात झाल्याचंही समोर आलं आहे. रेल्वे रुळ ओलांडणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तरीही काही जण नकळत रेल्वे रुळ ओलांडण्याचा गुन्हा करतात. अनेकदा या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई केली जाते. जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडू नका अशा सूचना प्रत्येक स्टेशनवर तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळाली असेल.
मात्र सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मालगाडी रेल्वे रुळावर उभी आहे. कदाचित कारशेडला जाणारी मालगाडी उभी असल्याचं दिसून येतं. पण याच मालगाडीच्या सावलीचा आधार घेत चक्क रेल्वे रुळावर एक प्रेमीयुगल बसल्याचा हा फोटो आहे. एकांत शोधण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घातल्याची कल्पनाही या प्रेमीयुगलांना नसावी. त्यासाठीच रेल्वेने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
रेल्वे मंत्रालयाने या फोटोची दखल घेत हा प्रकार धोकादायक आणि बेकायदेशी असल्याचं ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये रेल्वेनं म्हटलंय की, कृपया अशाप्रकारे मालगाडी उभी असताना रेल्वे रुळावर बसण्याचा कधीही प्रयत्न करू नका. ही मालगाडी कोणतीही पूर्वसूचना न देता चालू होऊ शकते. त्यामुळे तुमचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. अधिकृत रेल्वे फाटकातूनच प्रवास करावा. अलर्ट राहा, सुरक्षित राहा असं रेल्वेकडून प्रवाशांना सांगण्यात आलं आहे.