ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची उचलबांगडी करण्यात आल्यापासून नेतृत्वहीन झालेल्या बीसीसीआयला 24 जानेवारी रोजी नवे प्रशासक मिळणार आहेत. बीसीसीआयमधील नव्या प्रशासकांच्या नावांची घोषणा 24 जानेवारी रोजी करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले.
या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठाने बीसीसीआयच्या प्रशासक पदावरील नियुक्तीसाठी न्यायालयाचे मित्र म्हणून अनिल दिवाण आणि गोपाल सुब्रह्मण्यम यांनी सुचवलेल्या नावांना गोपनीय ठेवण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, राज्य संघटना आणि बीसीसीआय अशा दोन्ही संघटनांत मिळून एकूण 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारी व्यक्ती संघटनेत काम करण्यासाठी अपात्र ठरेल, या आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने संशोधन केले. आता नव्या निर्णयानुसार पदाधिकाऱ्यांचा राज्य संघटना आणि बीसीसीआय यामधील कार्यकाळ एकत्रित जोडून विचारात घेतला जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच रेल्वे, सेनादल आणि विद्यापीठ या संघांच्या अर्जांवर विचार करण्यासाठीही खंडपीठाने तयारी दर्शवली आहे.