ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 19 - कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्टात तोंडघशी पडलेल्या पाकिस्तान सरकारला आपल्या देशात चहूबाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. विरोधी पक्ष, नागरिकांकडून होणा-या या टीकेची धार कमी करण्यासाठी म्हणून पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय कोर्टात वकिलांची नवी फौज उभी करण्याचा विचार करत आहे.
नवी टीम आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानची बाजू भक्कमपणे मांडेल असे सरताज अजिज यांनी सांगितले. अजिज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार आहेत. भारताने दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम निकाल देईपर्यंत आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
मागच्यावर्षी पाकिस्तानने इराणमधून कुलभूषण जाधव यांना अटक केली. त्यांच्यावर गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवून लष्करी न्यायालयात गुप्तपणे खटला चालवून जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. खटल्याची सुनावणी सुरु असताना पाकिस्तानने जाधव यांना कुठलीही कायदेशीर मदत मिळू दिली नाही. त्यामुळे भारताने पाकिस्तानी कोर्टाच्या या निकालाला आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान दिले.
जाधव यांच्या शिक्षेचा विषय आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कक्षेत येत नाही असे आपले म्हणणे होते मग, आपण आंतरराष्ट्रीय कोर्टात का गेलो ? आपणच आपल्या पायावर कु-हाड मारुन घेतली आहे अशी प्रतिक्रिया निवृत्त पाकिस्तानी न्यायाधीश शाईक उस्मानी यांनी डॉन न्यूजला दिली.
क्रिकेटचे मैदान, रणभूमी पाठोपाठ आंतरराष्ट्रीय कोर्टातही भारतासमोर निभाव लागू न शकल्याने पाकिस्तानात मोठया प्रमाणावर अस्वस्थतता आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला सुरु असताना पाकिस्तानातील कायदेपंडितांनी जाधव यांच्या फाशीचा विषय आंतरराष्ट्रीय न्यायलयाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही असे चित्र तेथील जनतेसमोर निर्माण केले होते.