नवी दिल्ली : नवे कृषी कायदे पुन्हा अमलात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार नसल्याचे सांगत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आपल्या आधीच्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवे कृषी कायदे रद्द केले, असेही ते म्हणाले.नव्या कृषी कायद्यांबाबत तोमर यांनी नागपूर येथे नुकतेच एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. ते म्हणाले होते की, कृषीक्षेत्रामध्ये मोठी सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तयार केलेले तीन नवे कृषी कायदे काही लोकांना आवडले नाहीत. त्यामुळे हे कायदे रद्द करावे लागले. मात्र त्यामुळे केंद्र सरकार निराश झालेले नाही. आम्ही एक पाऊल मागे गेलो. मात्र आम्ही भविष्यात एक पाऊल पुढे जाऊ. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या कल्याणासाठी योग्य निर्णय घेणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही तोमर म्हणाले होते.
काँग्रेसकडून जनतेची दिशाभूलनव्या कृषी कायद्यांवरून जे वाद झाले, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मागितलेल्या जाहीर माफीचा तोमर यांनी अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. काँग्रेसवर पलटवार करताना नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस लोकांची दिशाभूल करू पाहात आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काँग्रेसने काहीही केलेले नाही.