भदोही : आवश्यकता भासल्यास पुन्हा नवे कृषी कायदे बनविणार असल्याचे वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी केले. उत्तर प्रदेशातील भदोही येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती.
त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर कलराज मिश्र म्हणाले की, तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अतिशय योग्य आहे. हे कायदे कसे फायदेशीर आहेत हे शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा केंद्राने आटोकाट प्रयत्न केला; पण त्यात यश आले नाही. हे कायदे रद्दच करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. त्यामुळे सरतेशेवटी केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला.
कलराज मिश्र यांच्या आधी भाजपचे उन्नाव लोकसभा मतदारसंघातील खासदार साक्षी महाराज यांनी सांगितले होते की, काही वेळेस कायदे बनले तरी त्यांना विरोध झाल्यामुळे रद्द केले जातात. मग पुन्हा आवश्यकता भासल्यास तसेच कायदे पुन्हा केले जातात. अशा घटना होतच असतात. तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यांपेक्षा देशाला जास्त महत्त्व दिले.
भाजप खासदाराची नापसंतीफरुखाबाद येथील भाजपचे खासदार मुकेश राजपूत यांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल नापसंती दर्शविली होती. मोदी यांनी नाइलाजाने हा निर्णय घेतला असल्याचे राजपूत म्हणाले होते. अशीच भावना भाजपच्या आणखी काही खासदारांची असल्याचे समजते.