भुवनेश्वर : फनी वादळाने ओडिशासह किनारपट्टीवर धुमाकूळ घातलेला आहे. या वादळातच भुवनेश्वरच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये एका मुलीचा जन्म झाला. विशेष म्हणजे या मुलीला वादळाचे नाव ठेवण्यात आले आहे.
येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये एका 32 वर्षीय महिलेला सकाळी 11 च्या सुमारास कन्यारत्न झाले. फनी वादळाच्या तडाख्यात अख्खे ओडिसा सापडलेले असताना या कुटुंबामध्ये आनंदाचे वादळ आले. यामुळे या कुटुंबाने या नवजात मुलीचे नाव फनी ठेवण्याचा निर्णय घेतला. ही महिला रेल्वेची कर्मचारी आहे. कोच दुरुस्ती कारखान्यामध्ये ती मदतनीस म्हणून काम करते.
दरम्यान, ओडिशामध्ये तीन जणांचा वादळामुळे मृत्यू झाला आहे. तसेच वाऱ्याचा वेग 175 ते 200 किमी प्रती तास एवढा प्रचंड होता. 1999 नंतर आलेले हे सर्वात शक्तीशाली वादळ आहे. भुवनेश्वरच्या विमानतळाच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे.