नवी दिल्ली : संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम होणे आवश्यकच आहे, असे प्रतिपादन लोकसभाध्यक्षओम बिर्ला यांनी केले आहेे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी नव्या इमारतीची विनंती सरकारला केली होती, तेव्हा लोकसभा किंवा राज्यसभेच्या एकाही खासदाराने इमारतीला विरोध केला नव्हता, असेही बिर्ला यांनी सांगितले.
बिर्ला यांनी पत्रकारांना सांगितले की, नव्या इमारतीचे बांधकाम सध्या नियोजनापेक्षा १६ दिवस पिछाडीवर चालत आहे. तरीही इमारतीचे काम ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल. वास्तविक सुरुवातीला आम्ही नियोजित वेळापत्रकाच्या २७ दिवस पुढे होतो. तथापि, कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर थोडा व्यत्यय आला. त्यामुळे आम्ही वेळापत्रकाच्या तुलनेत १६ दिवस मागे पडलो आहोत.
बिर्ला यांनी सांगितले की, संसदेची सध्याची इमारत ऐतिहासिक आहे. अनेक ऐतिहासिक घटना या इमारतीत घडल्या आहेत. तथापि, या इमारतीचा विस्तार केला जाऊ शकत नाही. तसेच बदललेल्या काळानुसार आवश्यक गरजा ही इमारत पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे नवी इमारत बांधणे आवश्यकच आहे.
आक्षेप नव्हता
इमारतीला होणाऱ्या विरोधाच्या संदर्भात बिर्ला यांनी सांगितले की, संसदेसाठी नवी इमारत बांधण्याची विनंती लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी सरकारला केली होती. त्यावेळी दोन्ही सभागृहातील एकाही खासदाराने इमारतीला आक्षेप घेतला नव्हता. इमारतीला विरोध करण्यासाठी माझ्याशी कोणीही संपर्क केला नव्हता. संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामावरून भाजपा आणि विरोधी पक्ष यांच्यात सध्या वाक्युद्ध सुरू आहे. देशात कोरोनाने लोक मरत असताना सरकार हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी नव्या इमारतीवर करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.