Rajasthan Ministers Resignation: राजस्थानमध्ये आज मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा दिला आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद मिटला असून आता राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नवे मंत्री रविवारी दुपारी चार वाजता शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राजस्थानच्या मंत्रिमंडळात काँग्रेसकडून फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. यात कॅबिनेटमधील तीन ते चार मंत्र्यांच्या जागी नवे चेहरे पाहायला मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण आज गेहलोत यांच्या सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे सर्वाच अवाक् झाले आहेत. नव्या मंत्रिमंडळात आता कुणाकुणीची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांच्या निवासस्थानी आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. उद्या दुपारी दोन वाजता प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात बैठक होणार असून यात पुढील सर्व निर्णय होणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा देखील जयपूरला पोहोचले आहेत. नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांबाबतही सहमती झालेली असल्याचं सांगितलं जात आहे.
कुणाकुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळनव्या मंत्रिमंडळात सचिन पायलट यांच्या गोटातून अनेकांची नावं पुढे येत आहेत. यात हेमाराम चौधरी, बृजेन्द्र ओला, दिपेंद्र सिंह शेखावत, रमेश मीणा आणि मुरारीलाल मीणा यांची नावं आघाडीवर आहेत. दुसरीकडे गेहलोत यांच्या गोटातील बसपाचे राजेंद्र गुढा, अपक्ष महादेव खंडेला, संयम लोढा, काँग्रेसचे आमदार महेंद्रजीतासिंह मालवीय, रामलाल जाट, मंजू मेघवाल, जाहिदा खान आणि शंकुतला रावत यांची नावं आघाडीवर आहेत.