- विकास झाडेनवी दिल्ली : कृषी कायद्यांविराेधात दाेन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाचे मध्यवर्ती केंद्र सिंघू सीमेवर हाेते. आता ती जागा गाझीपूर सीमेने घेतली आहे. दोन दिवसांमध्ये इथल्या शेतकऱ्यांची संख्या चारपटीने वाढली असून, विविध राजकीय पक्षांचे नेते राकेश टिकैत यांना भेटायला येत आहेत. गाझीपूर सीमेवर आज ५० हजारांवर शेतकरी असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे.२६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलक शेतकऱ्यांबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले होते. आंदोलक ज्या-ज्या सीमेवर बसले आहेत, त्या परिसरातील शेतकरी या आंदोलकांना हटवा म्हणून पोलिसांमध्ये तक्रार करीत आहेत. काही ठिकाणी संधी पाहून दगडफेकही करण्यात येत आहे. या कृती भाजपच्या लोकांकडून घडवून आणल्या जात असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा बोलावू शकते. असे असले, तरी शेतकऱ्यांना आंदोलनात कोणत्याही सुविधा मिळू नयेत, म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. गृहविभागाने सिंघू, गाझीपूर सीमेवरली इंटरनेट सेवा पुन्हा बंद केली आहे.शेतकऱ्यांनी पर्यायांबाबत चर्चा करावी : पंतप्रधान नरेंद्र मोदीअधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदाेलनाबाबत सरकारची भूमिका मांडली. सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी. कृषिमंत्री नरेंद्र ताेमर हे शेतकऱ्यांपासून फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत, असे मोदींनी बैठकीत सांगितले.आंदाेलनाची तीव्रता वाढली दोन वर्षांसाठी कायदा स्थगित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला होता. परंतु शेतकऱ्यांनी तो नाकारल्यानंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नाराज होत शेतकऱ्यांसोबत आता पुढची बैठक नाही, असे स्पष्ट केले होते. सोमवारी संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पाश्व�भूमीवर सरकारला बैठक घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सूत्रांनुसार केंद्र सरकार चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा बोलावू शकते. असे असले, तरी शेतकऱ्यांना आंदोलनात कोणत्याही सुविधा मिळू नयेत, म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. गृह विभागाने सिंघू, गाझीपूर सीमेवरील इंटरनेट सेवा पुन्हा बंद केली आहे.पोलिसांच्या कुटुंबीयांचे धरणे !२६ जानेवारीला पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जो संघर्ष झाला, त्यात काही पोलीसही जखमी झालेत. या घटनेचा निषेध म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी शहिदी पार्क येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने या आंदोलकांना सीमेवरून हटवावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे. राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा!गेल्या दोन दिवसांपासून गाझीपूर सीमेवर विरोधी पक्षातील नेत्यांची गर्दी होत आहे. आज अभय चौटाला पोहोचले. सगळ्यांनीच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासोबत चर्चा करीत आहेत. उद्या संयुक्त किसान मोर्चाची बैठक होत असून, त्यात पुढची रणनीती ठरेल.
आंदोलनाचे नवे केंद्र गाझीपूर सीमा, शेतकऱ्यांची संख्या चारपट; ५० हजार जण जमले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 7:55 AM