नवी दिल्ली : ‘बॉम्बे समाचार’चे संचालक होरमुसजी एन. कामा यांची सोमवारी प्रेस ट्रस्ट आॅफ इंडियाचे (पीटीआय) अध्यक्ष आणि ‘मल्याळम मनोरमा’चे संचालक रियाद मॅथ्यू यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. जागरण प्रकाशनचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक महेंद्र मोहन गुप्ता मावळते अध्यक्ष होत.कंपनीच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कामा आणि मॅथ्यू यांनी निवड करण्यात आली. कामा हे भारतात १८५५ पासून सतत प्रकाशित होत असलेल्या ‘बॉम्बे समाचार’ या सर्वांत जुन्या दैनिकाचे संचालक असून ते दोन वेळा इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष होते. सध्या ते रीडरशीप स्टडीज कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय कामा हे बोर्ड आॅफ आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशन (एबीसी) च्या बोर्ड आणि फॉर फेअर बिजनेस प्रॅक्टिसचेही सदस्य आहेत. ‘मल्याळम मनोरमा’चे वरिष्ठ सहायक संपादक रियाद मॅथ्यू हे ‘वीक’ या पत्रिकेचे प्रमुखही आहेत. कामा, मॅथ्यू आणि गुप्ता यांच्याशिवाय पीटीआय बोर्डच्या सदस्यांमध्ये के. एन. सनथकुमार (डेक्कन हेराल्ड), विनीत जैन (टाइम्स आॅफ इंडिया), अवीक कुमार सरकार (आनंद बाजार पत्रिका), विवेक गोयंका (इंडियन एक्सप्रेस), एन. रवी (द हिंदू), एम. पी. वीरेंद्र कुमार (मातृभूमी), संजय नारायण (हिंदुस्तान टाइम्स), विजयकुमार चोपडा (हिंद समाचार) आणि आर. लक्ष्मीपती (दिनामलार) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
होरमुसजी कामा पीटीआयचे नवे अध्यक्ष
By admin | Published: September 15, 2015 1:08 AM