रायपूर- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली य़ेथील एम्स रुग्णालयात निधन झाले. भारतामध्ये सर्वपक्षीय नेत्यांबरोबर जगभरातील विविध नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. छत्तीसगडने आपल्या नव्या राजधानीला अटलजींचे नाव देण्याची काल घोषणा केली आहे. या राजधानीचे नाव आता 'अटलनगर' असे करण्यात येणार आहे.
1998 साली अणूचाचणी यशस्वी करण्यामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल 'छत्तीसगड आर्म्ड फोर्सेस' (सीएएफ) बटालियनला पोखरण बटालियन असे नाव देण्यात येणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.छत्तीसगडची नव्याने बांधलेली राजधानी नया रायपूरमध्ये वाजपेयी यांचा पुतळा उभा केला जाणार असून सर्व 27 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये अटलजींचा पुतळा व एका सेंट्रल पार्कची निर्मिती केली जाणार आहे अशी घोषणा रमणसिंह यांनी केली आहे. नया रायपूर हे मूळ रायपूरच्या आग्नेयेस 20 किमी अंतरावर आहे.बिलासपूर विद्यापिठाला वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असून राजनांदगाव येथे बांधण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला, जांगिर चम्पा जिल्ह्यातील मारवा औष्णिक प्रकल्प व रायपूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या एक्स्प्रेस मार्गालाही अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे.
1 ऑक्टोबर रोजी छत्तीसगड निर्मिती दिन साजरा केला जातो. यादिवशी अटलबिहारी वाजपेयी सुशासन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उत्तम संस्थांना निवडून दिला जाईल तसेच वाजपेयी यांच्या चरित्रावर आधारित एका धड्याचाही समावेश छत्तीसगडमधील शालेय अभ्यासक्रमात केला जाईल. निवडणुकांच्या तयारीसाठी पुढील महिन्यामध्ये रमणसिंह विकास यात्रा आयोजित करणार आहेत, त्या यात्रेला अटल विकास यात्रा असे नाव देण्यात येणार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवरचा काव्यपुरसकार देण्यात येणार आहे.