गांधी कुटुब पक्षाचा पुढील अध्यक्ष रिमोट कंट्रोलने चालवेल, असे बोलले जात असतानाच, काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी हा आरोप शनिवारी फेटाळून लावला आहे. यासंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, अध्यक्ष पदाची निवडणूक लढत असलेले मल्लिकार्जुन खडगे आणि शशी थरूर हे दोन्ही दिग्गज आणि चांगली समज असणारे उमेदवार आहेत. या लोकांच्या बाबतीत अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे, त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. एवढेच नाही, तर आपला तपश्चर्येवर विश्वास आहे आणि 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमाने लोकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जगासमोर आणण्याची आपली इच्छा आहे, असेही राहुल यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात, पक्षाला नवा अध्यक्ष मिळाला तरी, तो गांधी कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलनेच चालेल, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. यासंदर्भात विचारले असता, राहुल म्हणाले, 'निवडणुकीला सामोरे जात असलेल्या दोन्ही लोकांचा एक दर्जा आहे, त्यांचा एक दृष्टिकोण आहे आणि ते चांगली जाण असलेले दिग्गज नेते आहेत. त्यांपैकी कुणीही रिमोट कंट्रेलने चालणारे आहे, असे मला वाटत नाही. खरे तर, ही चर्चा त्यांना अपमानित करण्यासाठी सुरू आहे.'
द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात लढणार - केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि काँग्रेसमधील संबंधांसंदर्भात भाजपने केलेल्या आरोपांवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, द्वेष आणि हिंसा पसरवणे एक देश विरोधी कार्य आहे आणि यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्ती विरोधात आम्ही लढणार. मग, ती व्यक्ती कोण आहे आणि कुठल्या समाजाची आहे, यात काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे एक राष्ट्र विरोधी कार्य आहे आणि आम्ही अशा लोकांविरोधात लढू.