३० वर्षात संशोधनाच्या नवीन वाटा
By admin | Published: July 29, 2015 12:38 AM
-लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचा आज स्थापना दिवस
-लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचा आज स्थापना दिवसनागपूर: भारतीय उद्यानिक संशोधन संस्था, बंगलोरचे विभागीय केंद्र म्हणून २८ जुलै १९८५ रोजी नागपूर येथे संत्रा संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. पुढे राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र म्हणून या संस्थेला बढती देण्यात आली. तेव्हापासून या केंद्राने संत्राच नाही तर सर्व लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता वाढविणे, त्यांची जैवविविधता जपण्याच्या संशोधनात मोलाची भूमिका बजावली आहे. केंद्राने विकसित केलेल्या नवनवीन तंत्रज्ञानामुळेच आज लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात भारताचा जगात मोठा वाटा आहे, हे विशेष.लिंबू उत्पादनात भारताचा जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो, तर लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात चौथा क्रमांक लागतो. देशात १० लाख हेक्टर जमिनीवर १०० लाख टन लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन केले जाते व गेल्या ४० वर्षात उत्पादनात २० टक्क्याने वाढ झाली आहे. मात्र १९८० च्या दशकापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. कोळशी रोगाच्या प्रादुर्भावाने लिंबूवर्गीय फळांवर संकट आले होते. त्यामुळे त्याच्या व्यवस्थापनासाठी नागपुरात या केंद्राची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून संत्रा व तत्सम लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता वाढविण्यासह नवीन आणि निरोगी रोप निर्माण करणे, जैवविविधता सांभाळणे, कीटक व रोगांचा प्रादुर्भाव रोखणे बाजारात भारतातील फळांसाठी स्थान निर्माण करण्याची जबाबदारी केंद्रावर होती. केंद्राने ती जबाबदारी सांभाळली. केंद्राचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राने कमी बिया असलेले व लवकर पक्व होणारे संत्र्याचे रोप तयार केले. संत्रा फळावरील विषाणूजन्य रोगांचे निवारण, डी-ग्रीनींग, मेणाचे आवरण, पॅकिंग, प्री-कुलिंग व साठवणूक संबंधीची प्रक्रिया प्रमाणित केली. कीटक व रोगांच्या रासायनिक व्यवस्थापनाचे प्रमाणीकरण केले. लिंबूवर्गीय फळांच्या नवीन ६१४ प्रजाती कें्रद्राने विकसित केल्या असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बीजविरहित संत्र्याची १५०० रोप तर रसाचे प्रमाण अधिक असलेल्या ५० हजार रोप तयार केल्याचे डॉ. लदानिया यांनी सांगितले. रोगविरहीत फळांच्या काही प्रजाती विकसित केल्याची माहिती त्यांनी दिली.