तिरुपती येथे काही दिवसापूर्वी प्रसादाच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता तिरुपती प्रकरणी आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आता आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रसादात किडे सापडल्याचा दावा एका भक्ताने केला आहे.
या आरोपीने असा दावा केला आहे की, मंदिरातील कर्मचाऱ्यांकडे प्रसादातील किडे असल्याची तक्रार केली तेव्हा असे अधूनमधून घडते असे सांगण्यात आले. याप्रकरणी मंदिर प्रशासनाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. चंदू नावाच्या व्यक्तीने सांगितले, मी वारंगळहून दर्शनासाठी निघालो होतो. मुंडण केल्यावर मी जेवायला गेलो. जेवताना मला दही भातामध्ये एक किडा सापडला. हा मुद्दा मी कर्मचाऱ्यांसमोर मांडला असता त्यांनी सांगितले की, असे कधी कधी होते.
"मी जेवणाचे फोटो आणि व्हिडीओ काढले त्यानंतर मंदिर अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. किडा प्रसादासाठी वापरला जाणाऱ्या पानावरुन आल्याचा दावा त्यांनी केला. हा निष्काळजीपणा अस्वीकारार्ह आहे. हे दूषित अन्न लहान मुले किंवा इतर कोणी खाल्ले तर अन्नातून विषबाधा होण्यास जबाबदार कोण?, असा सवालही त्यांनी केला.
मंदिराने काय सांगितलं?
येथे तिरुमला तिरुपती देवस्थानमने प्रसादातील कीटकांचे आरोप नाकारले आणि ते निराधार आणि खोटे ठरवले. ते म्हणाले की, दररोज हजारो भाविकांसाठी ताजा प्रसाद तयार केला जातो. कीटक सापडणे याची शक्यता कमी आहे.
हा आरोप संस्थेची बदनामी करण्याचा आणि भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यांनी भाविकांना अशा निराधार आणि खोट्या बातम्यांपासून दूर राहून श्री व्यंकटेश्वर आणि टीटीडी यांच्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.