नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे संसर्गात मोठी वाढ झाली आहे व लसीकरण अत्यंत धीम्या गतीने होत आहे. हा नवा विषाणू शरीरात अँटिबॉडीज तयार करण्यास अटकाव करतो तसेच त्याचे उत्परिवर्तनही विषाणूपेक्षा अतिशय वेगाने होते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.भारतात रोज ४ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत व ४ हजारांहून अधिक लोकांचे बळी जात आहेत. त्याबाबत त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नव्या विषाणूचा संसर्ग भारतामध्ये झपाट्याने फैलावत आहे. त्याला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरण मोहीम भारताने यापुढे वेगाने राबविली पाहिजे.
डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा १.६१७ हा नवीन प्रकार भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात आढळून आला होता. त्यामुळेच आता संसर्गाचा विस्फोट झाला आहे. ब्रिटन, अमेरिकेतही कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. भारतामध्ये नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत. विविध कारणांनी होणारी मोठी गर्दी तसेच शारीरिक अंतर राखण्याचा नियम पाळण्याबाबत असलेली ढिलाई यामुळेही भारतात कोरोना संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे.
प्रचारसभांचाही संसर्गवाढीला हातभार- जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी व अन्य नेत्यांनी आयोजिलेल्या निवडणूक प्रचारसभाही कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. - कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आता ही साथ संपली असा अनेक भारतीयांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सोडून दिले. अशा सर्व गोष्टींमुळे कोरोनाचा फैलाव प्रचंड वाढला.
फक्त २% लोकांचे लसीकरणभारतात कोरोना लसीकरण मोहीम अत्यंत धीम्या गतीने राबविण्यात येत आहे. या देशात लोकसंख्येच्या तुलनेत २ टक्के लोकांनाच लस देण्यात आली आहे. अशा गतीने ७० ते ८० टक्के लोकांचे लसीकरण होण्यासाठी कित्येक महिने लागू शकतात. - डॉ. सौम्या स्वामिनाथन, प्रमुख शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटना