मुंबई - संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावती चित्रपटावरून वादळ उठलेले असताना सेन्सॉर बोर्डाने काही तांत्रिक कारणे देत हा चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवल्याचे वृत्त असून या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ही निव्वळ अफवा असून चित्रपट 1 डिसेंबर रोजीच प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.पद्मावती चित्रपट नव्याने सेन्सॉर बोर्डाकडे आल्यानंतर नियमांची मोजपट्टी लावून त्याचे पुनरावलोकन केले जाईल आणि त्यानंतरच त्याबाबत अंतिम निर्णय दिला जाईल, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
चित्तोडगड किल्ल्यात प्रवेशबंदीदरम्यान पद्मावती सिनेमाच्या विरोधात शुक्रवारी (17 नोव्हेंबर) चित्तोडगड किल्ला, राजस्थान येथे नारेबाजी तसेच प्रवेशबंदी करण्यात आली. सिनेमामध्ये ऐतिहासिक तथ्यामध्ये काही बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
भन्साळींचे शीर कापून आणा, पाच कोटी मिळवा; राजपूत नेत्याकडून घोषणाउत्तरप्रदेशच्या मेरठमधील एका राजपूत नेत्याने अशी घोषणा केली की, जो व्यक्ती पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीली भन्साळी यांचे शीर कापून आणेल, त्याला 5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
नाक कापण्याची धमकी करणी सेनेचे सदस्य महिपाल सिंह मकरानाने एक व्हिडिओ जारी करून सांगितलं की, राजपूत कधीही महिलांवर हात उगारत नाही. पण गरज पडली तर आम्ही दीपिकासोबत ते करु. लक्ष्मणने शूर्पनखासोबत जे केलं होतं ते आम्ही तिच्यासोबत करू.
पद्मावतीला कोणीही रोखू शकणार नाही - दीपिका पदुकोणचित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत, असे अभिनेत्री दीपिका पदुकोणने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते. तसेच, हा चित्रपट ठरल्यानुसार 1 डिसेंबरला प्रदर्शित होईल, असा विश्वास सुद्धा तिने व्यक्त केला होता.
पद्मावतीला विविध संघटनांचा विरोध...पद्मावती या चित्रपटला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. जयपूरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्साळींना मारहाणही करण्यात आली होती. महाराणी पद्मावतीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तसेच या चित्रपटातून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.