ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर 9.2 लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा व्यवहारात आल्या असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली आहे. संसदेच्या अर्थ विषयक स्थायी समितीसमोर आज त्यांनी ही माहिती दिली आहे. आज संसदेच्या स्थायी समितीसमोर नोटाबंदीच्या निर्णयावर उत्तरे देण्यासाठी उर्जित पटेल हजर होते. 20 जानेवारी रोजी ते पुन्हा संसदेच्या लोक लेखा समितीसमोर हजर राहणार आहेत. या लोक लेखा समितीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सदस्य असणार आहेत. तर या समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली आहेत.
यावेळी नोटाबंदीनंतर आलेल्या समस्यांच्या प्रश्नांचा भडीमार केला गेला. नोटाबंदीनंतर काळा पैसा किती बाहेर आला? एकूण किती पैसा बँकांमध्ये जमा झाला? चलनतुटवडा कधी संपेल? यासारख्या प्रश्नांवर उर्जित पटेल यांनी मौन बाळगलं. अशी माहिती स्थायी समितीचे सदस्य सौगाता रॉय यांनी माध्यमांना दिली.
जानेवारी 2016 मध्ये नोटाबंदीची प्रक्रिया सुरु झाली होती - उर्जित पटेल
आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी संसदेच्या अर्थ विषयक स्थायी समितीसमोर आज मोठा खुलासा केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाची प्रक्रिया 2016 च्या जानेवारी मध्ये झाली होती. असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. यापुर्वी 10 जानेवारी 2017 रोजी 7 पानांच्या दस्तावेजात आरबीआय तर्फे असे सांगितले होते की, नोटाबंदीच्या निर्णयाची केंद्र सरकारनं एक दिवस आधी कल्पना दिली होती. त्यामुळे त्यांच्या या दोन्ही स्पष्टीकरणात भिन्नता दिसून येते. उर्जित पटेल यांच्या या दोन भिन्न वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो.