नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीच्या पोलीस मुख्यालयाच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन एका सहायक पोलीस आयुक्तानं आत्महत्या केली आहे. प्रेम बल्लभ असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांचे वय 55 वर्ष होते. दरम्यान, प्रेम बल्लभ यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (29 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास प्रेम बल्लभ पोलील मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास मुख्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या पदावरील पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. 29 मे रोजी उत्तर प्रदेश एटीएसमधील पीपीएस अधिकारी राजेश साहनी यांनीही स्वतःवरुन गोळी झाडून आत्महत्या केली होती. यापूर्वी 11 मे रोजी मुंबई पोलीसमधील एन्काऊंटर स्पेशलिस्ट आयपीएस अधिकारी हिमांशु रॉय यांनीही आत्महत्या केली होती. दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरी तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. कर्करोगाचे निदान आणि नंतर उपचार सुरू झाल्यावरही ते कामावर येत होते. मात्र आजार बळावल्यानंतर ते दोन वर्षांपासून रजेवर होते. हाडाच्या कर्करोगाला कंटाळून जीवन संपवत आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले होते.