नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते अजय माकन यांची दिल्लीकाँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केल्याची माहिती माकन यांनी दिली आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत माकन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, राजीनामा दिल्यानंतर माकन उपचारांसाठी परदेशात रवाना झाले आहेत. अजय माकन यांनी 13 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पार्टीचे दिल्लीचे प्रभारी पीसी चाको यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता.
या घडामोडींनंतर, आता पार्टीतील युवा नेत्याकडे पदाची जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरू आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता, त्यावेळेसही अजय माकन यांनी पदाचा राजीनामा दिला होता, मात्र तेव्हाही त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नव्हता. 2015 मध्ये पार्टीनं अजय माकन यांची दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली होती.
दरम्यान, अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. काही आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झाल्यानं ते उपचारांसाठी परदेशात गेले आहेत, असेही काँग्रेसनं म्हटले आहे.