दिल्लीतील तिहार जेल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिहार जेल हे देशातीलच नाही तर आशिया खंडातील हाय सिक्युरिटी जेलपैकी एक आहे. सध्या दिल्ली-एनसीआरमधील प्रमुख कुख्यात गुन्हेगार येथे बंदिस्त आहेत. या कारागृहात नऊ वेगवेगळे तुरुंग असून, तेथे हजारो कैदी आहेत. जयपूरच्या महाराणी गायत्री देवीदेखील याच तुरूंगात होत्या . वास्तविक त्यांच्या तुरुंगात जाण्याचा संबंध देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी आहे.
२५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीसाठी भारतात आणीबाणी घोषित करण्यात आली. यादरम्यान ३ सप्टेंबर १९७५ रोजी जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांना देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. मात्र, अटकेनंतर सरकारने त्यामागे अन्य कारणेही दिली होती. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना अटक केली होती.
तर दुसरीकडे त्यांना विदेशी वस्तू छुप्या पद्धतीनं आयात करणं आणि विदेशी मुद्रा अधिनियमांतर्गत अटक करण्यात आल्याची चर्चा इंदिरा गांधी यांचे समर्थक करत होते. परंतु आपल्याला सत्ताधारी पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही वागणुकीचा विरोध केल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.
… तेव्हा वाटली होती भीतीमहाराणी गायत्री देवी यांना जेव्हा तिहार तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा त्या घाबरल्या होत्या त्यांना महिला वॉर्डमध्ये कैदी नंबर २२६५ देण्यात आला होता. त्या अनेक महिने या ठिकाणी कैद होत्या. परंतु प्रकृती खराब झाल्यानं नंतर त्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादरम्यान, काश्मीरचे तात्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला त्यांना भेटण्यासाठी आले होते. मृदूला सिन्हा यांच्या ‘राजपथ से लोकपथ पर’ या पुस्तकात त्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
राजकारणात सक्रियमहाराणी गायत्री देवी या राजकारणात सक्रिय होत्या. त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजयही मिळवला होता. महिलांच्या अधिकारासाठीही त्यांनी खुप संघर्ष केला. महिलांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी जयपूरमध्ये शाळा सुरू केली. १९७५ मध्ये वोगनं त्यांना जगातील सर्वात सुंदर दहा महिलांच्या यादीत स्थान दिलं होतं. १९४० मध्ये त्यांचा विवाह महाराजा सवाई मानसिंह यांच्यासोबत झाला होता.