नवी दिल्ली - दादरच्या चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या जागेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या कामास गती मिळू लागली आहे. अनेक वर्षांपासून बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम प्रतीक्षेत होते. पण स्मारकासाठी मोठा लढा उभारण्यात आला, बरीच आंदोलनं झाल्यानंतर अखेर स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यादरम्यान, स्मारकाबाबतचे महत्त्वपूर्ण वृत्त समोर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध मूर्तिकार पद्मश्री राम सुतार यांच्यावर सोपवली आहे. बाबासाहेबांचा पुतळा 350 फूट उंचीचा असणार आहे.
दोन वर्षामध्ये या पुतळ्याच्या उभारणीचे कार्य पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. आंबेडकरांचा पुतळा घडवण्याचे कार्य राम सुतार यांच्या नोएडातील स्टुडिओमध्ये करण्यात येणार आहे. त्यांच्या स्टुडिओमध्ये बनवण्यात येणाऱ्या डिझाईनच्या आधारे चीनमध्ये त्याचा साचा तयार करण्यात येणार आहे. या साच्याद्वारे आंबेडकरांचा कांस्य धातूचा पुतळा बनवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त इंदू मिलमध्ये आंबेडकरांच्या 25 फूट उंचीच्या पुतळ्यासाठीही वेगळी जागा असणार आहे. हा पुतळा सुतार यांनी पूर्वीच तयार केला आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि गुजरातमधली भरूच येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचंही काम राम सुतारच पाहत आहेत.
इंदु मिलच्या 12.4 एकर जमिनीवर 425 कोटी रुपये खर्च करून आंबेडकरांचं स्मारक उभारण्यात येत आहे. 14 एप्रिल 2020पर्यंत स्मारक उभारणीचं काम पूर्ण होणार आहे. 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले होते. ही जमीन पूर्वी केंद्र सरकारच्या ताब्यात होती. गेल्यावर्षी केंद्र सरकारनं ही जमीन महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित केली
असे असेल बाबासाहेबांचे स्मारक 1. बाबासाहेबांचा 350 फूट उंचीचा पुतळा2. प्रदर्शन हॉल, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग3. बौद्ध स्थापत्य शैलीनुसार डोम4. संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, ग्रंथालय, परिषद सभागृह. बाबासाहेबांचा जीवनपट उलगडवून सांगणारी साहित्य संपदा