ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, ४ - हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणावरून सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. मात्र असे असतानाच दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या (आयआयएमसी) विद्यार्थ्याने दलितांविरोधात लिहीलेल्या एका फेसबूक पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला असून कॅम्पसमधे तणावाचे वातावरण आहे.
उत्कर्ष सिंग या विद्यार्थ्याच्या फेसबूक पोस्टमध्ये दलितांविरोधात काही आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले असून त्याने दलितांना मुख्य प्रवाहात येण्याचेही आवाहन केले आहे. मात्र त्याच्या या पोस्टमुळे दलित विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.
सध्या विद्यापीठातील वातावरणामुळे आम्ही दुखावलो असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी त्या संबंधित विद्यार्थ्याच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी मागास जातीतील सुमारे ३० विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिका-यांकडे २९ जानेवारी रोजी तक्रार नोंदवली. मात्र अशा मुद्यांच्या निवारणासाठी कॅम्पसमध्ये तक्रार निवारणाची सोय नसल्याचे आम्हाला सांगण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठात एससी/ एसटी अथवा महिलांसाठी विशेष सेल नसल्याचेही त्यांनी सांगितले.