New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. महाकुंभसाठी प्रयागराजला जाणाऱ्या विशेष गाड्यांचे प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्यात आल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे म्हटलं जात आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला आहे. या चेंगराचेंगरीत अनेकांनी आपल्या प्रियजनांना कायमचं गमावलं आहे. यावेळी स्टेशनवरील हमालांनी अनेकांना चेंगराचेंगरीतून बाहेर काढून वाचवलं. अशाच एका हमालाने चिमुकल्या मुलीला वाचवल्यानंतर घडलेला भावनिक प्रसंग सांगितला आहे. मुलीला वाचवल्यामुळे तिच्या आईने या हमालाचे आभार मानले.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेली चेंगराचेंगरी प्रत्यक्षदर्शी अजूनही विसरू शकलेले नाहीत. रात्री दहाच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत एकाच वेळी १८ जणांचा जीव कायमचा गेला. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद हासिमने चार वर्षाच्या मुलीचा जीव कसा वाचवला हे सांगितले. मुलीला वाचवल्यानंतर त्याने तिला आईकडे सोपवलं हे सांगताना मोहम्मद भावूक झाला होता.
मोहम्मदने सांगितले की, "चेंगराचेंगरीनंतर एक महिला माझी ४ वर्षांची मुलगी मरण पावली असं म्हणत रडत होती. मी त्या मुलीला बाहेर घेऊन आलो. दोन मिनिटांनंतर, मुलीने पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात केली आणि रडायला सुरुवात केली. त्यानंतर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. जीव धोक्यात घालून गर्दीत जाणाऱ्या स्वतःला शूर म्हणावं की मूर्ख म्हणावं? आम्हालाही जीव गमवावा लागेल अशी भीतीही वाटत होती. आम्ही अनेकांचे प्राण वाचवले. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी घटना पाहिली आहे."
"आम्ही नेहमीप्रमाणे काम करत होतो, तेव्हा अचानक आम्हाला ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही सर्व हमाल तिकडे धावलो. आम्ही जमिनीवर पडलेली मुले, महिला आणि पुरुष इकडे तिकडे धावताना पाहिले. लोक ओरडत होते. आम्ही अनेक मुलांना उचलून बाहेर काढले. काही लोकांचा मृत्यू झाला होता तर काही बेशुद्ध पडले होते. आम्ही त्यांना रुग्णवाहिकेत नेले. मी ८-१० मुलांना वाचवले. त्यावेळी काय झाले ते मला माहीत नाही. प्रत्येक वेळी व्यवस्था खूप चांगली असते. छठच्या वेळी जवळपास पाच लाखांची गर्दी असते, तरीही व्यवस्था चांगली असते, यावेळी काय झाले ते मला माहीत नाही," असंही मोहम्मदने सांगितले.
दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नऊ महिला, पाच मुले आणि चार पुरुषांचा समावेश आहे. त्यापैकी ९ बिहार, ८ दिल्ली आणि १ हरियाणाचा आहे. त्याचवेळी या घटनेत २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या लोकनायक जय प्रकाश हॉस्पिटल आणि लेडी हार्डिंग हॉस्पिटल या दोन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.