नवी दिल्लीरेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे फोटो आणि व्हिडीओ पाहून अंगावर काटा येत आहे. १८ जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. आपल्या नातेवाईकाचा मृतदेह पाहून रुग्णालयातून परतलेल्या एका महिलेने माध्यमांना जे काही सांगितलं आहे ते खूपच भयावह आहे. त्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. बिहारच्या रहिवासी असलेल्या शोभा यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं की, रुग्णालयातील बेड जखमींनी भरलेले आहेत. तसेच एका बेडवर चार मृतदेह ठेवलेले आहेत. रुग्णालयात असंख्य मृतदेह आहेत. जखमींची संख्या सुमारे ५०-६० आहे. माझ्यात मृतदेह पाहण्याची हिंमत नाही.
महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाला. स्टेशनवर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, घटनेच्या वेळी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर येणार होती. परंतु ट्रेन येण्याच्या काही वेळ आधी प्लॅटफॉर्म बदलण्यात आला, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि प्रवाशी प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी गर्दी करू लागले. अशा परिस्थितीत पुलावर बसलेले प्रवासी चिरडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.
स्टेशनवर कुली म्हणून काम करणारी रिंकू मीना म्हणाल्या, चेंगराचेंगरीच्या वेळी मी पुलावर उभा होतो. ही ट्रेन आधी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर पोहोचणार होती. घोषणेत त्याचा प्लॅटफॉर्म बदलण्यात आला. यामुळे पायऱ्यांवर बसलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. पायऱ्यांवर बसलेले लोक गर्दीखाली चिरडले गेले आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला.
"दोन्ही ट्रेनचं एक सारखंच नाव..."; दिल्ली पोलिसांनी सांगितलं स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली?
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन ट्रेनच्या एक सारख्याच नावामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे की, "प्रयागराज" नावाच्या दोन ट्रेन होत्या. एक प्रयागराज एक्सप्रेस आणि दुसरी प्रयागराज स्पेशल.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर येण्याच्या घोषणेमुळे गोंधळ निर्माण झाला. कारण प्रयागराज एक्सप्रेस आधीच प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती. ज्यांना त्यांच्या ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म १४ वर पोहोचता आले नाही त्यांना वाटलं की त्यांची ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर येत आहे, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. मात्र या दोन वेगवेगळ्या ट्रेन होत्या. प्रयागराजकडे जाणाऱ्या चार ट्रेन होत्या, त्यापैकी तीन ट्रेन उशिराने धावत होत्या. त्यामुळे स्टेशनवर खूपच गर्दी झाली.