New Delhi Railway Station Stampede: शनिवारी रात्री नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ मुले आहेत. यापैकी सर्वाधिक ९ जण बिहारमधील, ८ दिल्लीतील आणि एक हरयाणातील आहेत. ही घटना रात्री १० वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर घडली. प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी ही घटना घडली, अचानक घडलेल्या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. पण, चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली. रेल्वेस्टेशनवर कोणी अफवा पसरवली होती का? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
एलएनजेपी रुग्णालयाने मृत्यूंची पुष्टी केली आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, 14 जणांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. प्रयागराजकडे जाणाऱ्या दोन गाड्या लेट झाल्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढली.
यामुळे झाली चेंगराचेंगरी
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचे नेमकी कशामुळे झाली याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. दरम्यान आता याबाबतची एक माहिती समोर आली आहे. रेल्वे विभागाने एका विशेष ट्रेनची घोषणा केली होती. या घोषणेमुळे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी दावा केला जात आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीमुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील गर्दी सतत वाढत होती. परिस्थिती अशी होती की एका तासात १५०० तिकिटे खरेदी केली जात होती. महाकुंभाला जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती. तर प्रयागराजला जाणाऱ्या दोन विशेष गाड्या उशिराने धावत होत्या. अशा परिस्थितीत, रेल्वेने आणखी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून निघण्याची घोषणा केली. दुसरीकडे, इतर प्लॅटफॉर्मवर वाट पाहणाऱ्या लोकांनी विशेष ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी ही चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले आहे.