- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली - दिल्लीत येताय? सावधान ! इथली हवा तुमची जगण्याची 6 वर्षं कमी करू शकते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी दिल्लीत एअरलॉक होण्याची भीती व्यक्त केली आहे. धुके व प्रदूषणामुळे तयार होणारे स्मॉग स्थिर राहिल्यास एअरलॉकची स्थिती निर्माण होते. ही आणीबाणीसदृश्य स्थिती नसली तरी; वाढत्या प्रदूषणाने सरासरी आयुष्य 6 वर्षांनी घटेल, असा दावा एम्सच्या तज्ञ डॉक्टरांनी केला आहे.सलग दोन दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक 400 पेक्षा जास्त राहिल्यास पर्यावरण आणीबाणी घोषित केली जाईल. तसे झाल्यास शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली जाते. दिल्लीत नजीकच्या राज्यातून येणाऱ्या जड वाहनांना बंदी केली जाईल. यासंबंधीचा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता आहे.कडाक्याच्या थंडीचा डिसेंबर सुरू होण्याआधीच प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. प्रदूषित हवेमुळे श्वसननलिकेवर परिणाम होवून अनेक अवयव निकामी होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.सकाळी फेरफटका मारण्याचा विचारही दिल्लीकर करू शकत नाहीत. सकाळच्या हवेत सर्वात घातक घटक असतात. दिल्ली उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीत दरवर्षी होणारी प्रसिद्ध अर्ध मॅरेथॉन यंदा रद्द केली.
नवी दिल्लीतल्या प्रदूषित हवेमुळे आयुष्य होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 9:57 PM