नवी दिल्ली: मोदी सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. विद्यार्थी ज्ञानार्थी व्हावेत, त्यांनी केवळ परीक्षार्थी राहू नये, यासाठी शैक्षणिक धोरणात अतिशय महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सध्या देशात १०+२ शिक्षण पद्धत लागू आहे. आता त्यात आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे १०+२ ची पद्धत जाऊन ५+३+३+४ अशी नवी व्यवस्था आकारास येईल.सध्याच्या घडीला देशात १०+२ पद्धत रुढ आहे. मात्र नव्या पद्धतीत बोर्ड परीक्षांचं महत्त्व कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे १०+२ व्यवस्थेची जागा ५+३+३+४ घेईल. पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक ते दुसरी (५ वर्ष), दुसऱ्या टप्प्यात तिसरी ते पाचवी (३ वर्ष), तिसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवी (३ वर्ष) आणि चौथ्या टप्प्यात नववी ते बारावी (४ वर्ष) अशी शैक्षणिक व्यवस्थेची नवी रचना असेल. सध्या दहावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान अशा तीन शाखा उपलब्ध असतात. याच तीन शाखांचा विचार विद्यार्थ्यांकडून प्रामुख्यानं केला जातो. एका शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेतला एखादा विषय आवडत असेल, तर तो शिकता येत नाही. मात्र नव्या शैक्षणिक धोरणामुळे अशा प्रकारे दुसऱ्या शाखेचा, अभ्यासक्रमातला विषय शिकता येईल. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.नव्या शैक्षणिक धोरणाची ठळक वैशिष्ट्यं-- शिक्षकांसोबतच पालकांनादेखील जागरूक करण्यावर भर- प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता वाढवण्यावर, प्रोत्साहन देण्यावर प्राधान्य- रचनात्मक विचार करण्यास प्रोत्साहन- नैतिकता, घटनात्मक मूल्यं अभ्यासक्रमाचा प्रमुख हिस्सा असतील.नव्या शैक्षणिक धोरणाची संस्थात्मक वैशिष्ट्यं- 2040 पर्यंत सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये अधिकाधिक विषय, अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचं ध्येय- तीन हजार किंवा त्याहून अधिक विद्यार्थी असलेल्या शैक्षणिक संस्था तयार करण्यावर भर- २०३० पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात अनेक विषयांचं शिक्षण देणारी किमान एक संस्था असेल- सार्वजनिक संस्थांच्या विकासावर भर देणारा अभ्यासक्रम असेल- ओपन डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाईन एज्युकेशनचे पर्याय शैक्षणिक संस्थांकडे असतील.- उच्च शिक्षणासाठी उभारण्यात आलेली सर्व प्रकारची संलग्न विद्यापीठं आता विद्यापीठं म्हणूनच ओळखली जातील. - बौद्धिक, सामाजिक, शारीरिक, भावनात्मक आणि नैतिक क्षमतांचा विकास करण्याचं लक्ष्य
शिक्षण क्षेत्रातील 10+2 पद्धत जाणार; 5+3+3+4 व्यवस्था येणार; जाणून घ्या नेमकं काय बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 7:24 PM