Ajit Pawar: या आमदाराने अजित पवारांचा विक्रम मोडला; घेतली सर्वाधिक मते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 12:10 PM2022-03-11T12:10:15+5:302022-03-11T12:10:36+5:30
नोयडाचे भाजप उमेदवार पंकज सिंह यांनी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विक्रम मोडला.
- शरद गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काशीराम यांनी १९८४मध्ये स्थापन केलेल्या बहुजन समाज पार्टीचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत केवळ एक उमेदवार विजयी झाला आहे. २०१७मध्ये ‘बसपा’ने २२ टक्के मते मिळवताना १९ जागांवर विजय मिळवला होता. २०१२मध्ये ८० तर २००७मध्ये २०६ जागांवर विजय मिळवत थेट सत्ता हस्तगत केली होती. मात्र, यंदा बसपाला केवळ १२.७ टक्के मिळालेली दिसत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते बसपाची मते भाजपकडे वळली आहेत.
अजित पवारांचा मतांचा विक्रम मोडला
नोयडाचे भाजप उमेदवार पंकज सिंह यांनी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विक्रम मोडला. पंकज सिंह हे १ लाख ७५ हजार मतांनी निवडून आले. तर अजित पवार यांना १ लाख ६५ हजार २६५ मते मिळाली होती. अजित पवार यांनी यापूर्वी १९९५, २००९ च्या निवडणुकीमध्येही सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त केले होते.
काय आहेत जातींची गणिते?
ब्राह्मण, मुस्लिम आणि दलित समाजाच्या जोरावर उत्तम कामगिरी करण्याचा बसपाला विश्वास होता. त्यामुळे मायावतींनी ८६ मुस्लिम, ७० ब्राह्मण, ६५ जाट आणि ११४ इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाचे उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. ओबीसींमध्ये २१ कुर्मी, १८ यादव आणि मौर्य आणि कुशवाहा समाजातील १७ जणांना उमेदवारी दिली होती.