नवी दिल्ली : भारत आणि ग्रीस यांनी सोमवारी लष्करी उपकरणांचे एकत्रित उत्पादन आणि विकासासाठी काम करण्याचे मान्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर आलेली ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या भेटीदरम्यान शक्य तितक्या लवकर गतिशीलता आणि स्थलांतर करार करण्यावर भर देण्यात आला. भेटीत द्विपक्षीय संबंधांना “नवीन ऊर्जा” प्रदान करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली.
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दोन्ही बाजूंच्या समान चिंता आणि प्राधान्यक्रम आहेत. दोन्ही नेत्यांनी भारत-मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉरच्या (आयएमईसी) माध्यमातून दळणवळण वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली आणि द्विपक्षीय उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल, असे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले.
२०३० पर्यंत व्यापार दुप्पट करणार
चर्चेत उभय पक्षांनी औषधी, वैद्यकीय उपकरणे, तंत्रज्ञान, नवोपक्रम, कौशल्य विकास, कृषी आणि अवकाश यांसारख्या अनेक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. आजची आमची चर्चा खूप अर्थपूर्ण होती. ही आनंदाची बाब आहे की आम्ही २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहोत, असे मोदी म्हणाले.