काँग्रेसच्या मदतीला ‘पोडा’ येणार?, सामाजिक हिताचे नवीन समीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:04 AM2017-12-09T04:04:27+5:302017-12-09T04:04:54+5:30
काँग्रेसने यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीत उतरताना ‘पोडा’ हे समीकरण आखले आणि या सामाजिक हिताच्या तत्त्वाच्या आधारे काँग्रेसने आपले धोरण निश्चित केले
महेश खरे
सुरत : काँग्रेसने यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीत उतरताना ‘पोडा’ हे समीकरण आखले आणि या सामाजिक हिताच्या तत्त्वाच्या आधारे काँग्रेसने आपले धोरण निश्चित केले. हे ‘पोडा’ समीकरण कामाला येईल, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.
निवडणुका घोषित होण्याच्या आधीपासूनच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोळंकी मध्यमवर्गीय, शहरी, महिला आणि युवावर्ग (एमयूएलवाय-मुली) या चौरंगी सूत्राच्या आधारे गुजरातची निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यात समाजातील जाती व अन्य घटक यांचा विचार नव्हता. राज्यात गेल्या दोन वर्षांत झालेली आंदोलनेही त्यात विचारात घेण्यात आली नव्हती. त्यामुळे काँग्रेसने रणनीतीत बदल केला. निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीसाठी काँग्रेस आणि नेतृत्व मुद्दे शोधत गुजरातमधील स्थितीवर लक्ष ठेवून होते. तेव्हा सामाजिक हितासाठी लढणाºया विविध संंघटनांच्या नेत्यांना सोबत घेणे आणि त्यांच्या मदतीने निवडणूक लढविणे योग्य ठरेल, असे काँग्रेसच्या नेत्यांना प्रकर्षाने लक्षात आले. त्यामुळे काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी, अर्जुन मोढवाडिया आदी नेत्यांनी सामाजिक आंदोलनांचे नेतृत्व करणाºया नेत्यांशी चर्चा करून समझोता करण्याची जबाबदारी स्वीकारली.
वाटाघाटीचे गुन्हाळ अनेक दिवस चालल्यानंतर पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवाणा, ओबीसीचे नेते अल्पेश ठाकूर आणि आदिवासींचे नेते व आमदार छोटुभाई वसावा यांच्याशी समझोता झाला.
काय आहे पोडा...?
पाटीदार, ओबीसी, दलित आणि आदिवासी समुदायाला सोबत घेऊन काँग्रेसने ‘पोडा’ असे नवीन सामाजिक समीकरण जुळवत सामाजिक हिताचे तत्त्व अंगीकारले. (पी-पाटीदार, ओ-ओबीसी, डी-दलित, ए-आदिवासी)
युवकांची साथ : पाटीदार, ओबीसी व दलित समाजाचे नेते तरुण आहेत. त्यांच्याकडे युवकांची फौज असून, यात महिलांची मोठी संख्या आहे. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकूर, तसेच छोटुभाई वसावा हे सारे विविध प्रश्नांवर सातत्याने लढत आहेत. काँग्रेसला या सर्वांची साथ मिळाली असून, भारतीय आदिवासी पक्षही काँग्रेससोबत आहे. सामंजस्याने जागांचे वाटपही झाले असून, मतदार या आघाडीला किती प्रतिसाद देते, हे मतदानातूनच स्पष्ट होईल.