नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी यांच्यासह पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व ७७ वर्षाचे भाजप नेते कोश्यारी यांना नेमण्यात आले आहे.
या सर्व नेमणुका नवे राज्यपाल ज्यादिवशी पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून लागू होतील असे राष्ट्रपती भवनाच्या निवेदनात नमुद करण्यात आले. तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिळीसाई सुंदरराजन (५८ वर्षे) यांच्या नेमणुकीने तेलंगणाच्या निर्मितीनंतर त्या राज्याला प्रथमच स्वतंत्र राज्यपाल मिळाले आहेत. भाजप नेते बंडारु लक्ष्मण (७२) हे हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल असतील. तेथे अलीकडेच नेमण्यात आलेले विद्यमान राज्यपाल कलराज मिश्र (७८) यांची राजस्थानला बदली करण्यात आली आहे.शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्याचा कायदा करण्याच्या निषेधार्थ राजीव गांधी सरकारमधून राजीनामा दिलेले माजी केंद्रीय मंत्री अरिफ मोहम्मद खान (६८) यांच्याकडे केरळचे राज्यपालपद सोपविण्यात आले आहे. खान काँग्रेस सोडल्यानंतर आधी मायावतींच्या बसपत जाऊन नंतर भाजपवासी झाले होते. मात्र गेली दहा वर्षे ते सक्रिय राजकारणात नव्हते.तामिळनाडूत पक्षविस्तारासाठी भाजपची पावलेतामिळनाडूत आपले स्थान निर्माण करण्याचे भाजप कसून प्रयत्न करत आहेत. मात्र या राज्यात भाजपला किंचितसही प्रभाव निर्माण करता आलेला नाही. त्यातच तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता रजनीकांत, कमल हसन यांच्या प्रवेशामुळे रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवर तेथील भाजप प्रदेशाध्यक्ष तमिळीसाई सुंदरराजन यांना तेलंगणाचे राज्यपाल करण्यात आले आहे. या राज्यात भाजप लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष नेमून पक्षविस्तारासाठी आणखी जोरकस पावले टाकणार असल्याची चर्चा आहे.