नवी दिल्ली : जगभरातील वाढत्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गादरम्यान परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मंगळवारपासून नवीन नियम लागू झाले आहेत. भारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना (International Passengers) आगमनानंतर सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) राहणे आणि आठव्या दिवशी RT-PCR चाचणी करणे अनिवार्य केले आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता, या संदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरील निर्बंध वाढवण्यात आले आहेत.
जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे 11 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून लागू होतील आणि पुढील सरकारी आदेशापर्यंत ती लागू राहतील. सध्याच्या नियमांनुसार, जे सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत, जोखमीचा देश म्हणून सूचीबद्ध असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना आगमन झाल्यावर आपले सॅम्पल कोरोना चाचणीसाठी द्यावे लागतील आणि विमानतळावरून बाहेर जाण्यासाठी किंवा गंतव्यस्थानासाठी पुढील (कनेक्टिंग) फ्लाइटमध्ये चढण्यासाठी चाचणीच्या निकालांची प्रतीक्षा करावी लागेल. ज्यांना चाचणीत संसर्गाची पुष्टी होईल, त्यांना क्वारंटाईन केंद्रात पाठवले जाईल.
चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि त्यानंतर आठव्या दिवशी त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. त्यांना एअर सुविधा पोर्टलवर (संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या देखरेखीसाठी) आठव्या दिवशी घेण्यात आलेल्या चाचणीचा निकाल अपलोड करावा लागेल. चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्यास, त्यांना पुढील सात दिवस त्यांच्या आरोग्याचे स्वत: चे निरीक्षण करावे लागेल.
जोखीम नसलेल्या देशांतील प्रवाशांचे आगमन झाल्यावर, त्यांना सात दिवस घरामध्ये अनिवार्यपणे क्लारंटाईन राहावे लागेल आणि जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांनी इतर सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे. ज्या देशांमधून प्रवाशांना अतिरिक्त उपायांचे पालन करणे आवश्यक आहे, त्या देशांच्या लिस्टमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, घाना, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, टांझानिया, हाँगकाँग, इस्रायल, काँगो, इथिओपिया, नायझेरिया, ट्युनिशिया आणि झांबिया यांचा समावेश आहे. या अतिरिक्त उपायांमध्ये आगमनानंतरची चाचणी (जोखीम असलेल्या देशांमधून आगमन झाल्यावर) देखील समाविष्ट आहे.
दुसरीकडे, ज्या देशांना जोखमी नसलेल्या यादीत टाकले आहे. त्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जाईल आणि त्यासाठी यापैकी कोणत्याही दोन टक्के प्रवाशांचे नमुने घेतले जातील. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक फ्लाइटमधील हे 2 टक्के प्रवासी संबंधित एअरलाइनद्वारे ओळखले जातील. या प्रवाशांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यास प्रयोगशाळा प्राधान्य देतील. सागरी बंदरातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही संपूर्ण प्रक्रिया पाळावी लागणार आहे. मात्र, सध्या अशा प्रवाशांसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा नाही. तसेच या प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना त्यांच्या होम आयसोलेशनमध्ये 14 दिवस वेगळे राहावे लागेल.