नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्त साधून आपले सोशल मीडिया अकाऊंटस् अशा महिलांकडे सोपवून दिले आहे, की ज्या महिलांची यशोगाथा जगासाठी प्रेरणा स्त्रोत आहे. त्यानुसार, आता नरेंद्र मोदींचेट्विटर अकाऊंट सुप्रसिद्ध महिला हाताळत आहेत.
नरेंद्र मोदींनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, "महिला शक्तीच्या जिद्दीला सलाम. गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे मी आता साइन ऑफ करत आहे. मात्र, आज दिवसभरात सात महिला आपल्या यशोगाथा, त्यांच्या जीवनाचा यशस्वी प्रवास माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगतील."
नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या स्नेहा मोहनदास यांच्याकडे एका युजरने मोदींच्या ट्विटर अकाउंटचा पासवर्ड मागितल्यानंतर त्याला अनोख्या शब्दांत उत्तर देण्यात आले. विक्रांत भदौरिया नाव असलेल्या या व्यक्तीने स्नेहा मोहनदास यांना म्हटले, "प्लीज पासवर्ड सांगा." त्याला रिट्विट करत स्नेहा मोहनदास म्हणाल्या, "New India...लॉग इन तर करून पाहा." दरम्यान, स्नेहा मोहनदास यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदींनी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबरील आपली सोशल मीडिया अकाऊंटस् सोडून देण्याचा विचार करीत असल्याची पोस्ट टाकल्यावर चर्चांना सुरुवात झाली होती. त्यांची ही पोस्ट येताच अवघ्या अर्ध्या तासात 26 हजारांपेक्षा जास्त वेळा ती री-ट्विटही झाली होती. मात्र, गेल्या मंगळवारी नरेंद्र मोदींनी आम्हाला जीवन आणि कार्यातून प्रेरणा देणाऱ्या महिलांकडे मी माझी सोशल मीडिया अकाऊंटस् सोपवून देईन, असे स्पष्ट केले. जनतेने अशा प्रेरणादायी महिलांच्या कथा मला कळवाव्यात, असे आवाहनही नरेंद्र मोदींनी केले. त्यामुळे सुरू झालेल्या चर्चांना पूर्णवराम मिळाला आहे.