नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. दुपारी 12.30 वाजता होणारा हा प्रवेश दुपारी 2.55 ला घेण्यात आला. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. त्यानंतर, ज्योतिरादित्य शिंदेंनीकाँग्रेस नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसमध्ये नवं नेतृत्वा मान्य होत नसल्याचं ते म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकही केले.
ब्रेकिंग! ज्योतिरादित्य शिंदेच्या हाती कमळ; मध्य प्रदेशात भाजपाला मोठं बळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचे ज्योतिरादित्य शिंदेंनी आभार मानले. माझ्या आयुष्यात 2 तारखांना अतिशय महत्त्व आहे, 30 सप्टेंबर 2001 रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले. या दिवसामुळे माझं आयुष्य बदललं. तर, दुसरी तारीख 10 मार्च 2020 जी वडिलांची 75 वी जयंती आहे. ज्यादिवशी मी एक मोठा निर्णय घेतलाय. राजकारण करत असताना, भारत मातेची सेवा करणं हेच उद्देश असायला हवं, तर राजकारण हा त्याच्या उद्देशपूर्तीचा मार्ग असावा. माझ्या वडिलांनी मध्य प्रदेश आणि देशाची सेवा केली. मी काँग्रेस पक्षातून आता भाजपाता काम सुरू करतोय, असे म्हणत काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली. ''काँग्रेस पहिल्यासारखी राहिली नाही. सध्या, जनसेवेचा उद्देश काँग्रेस संघटनेतून पूर्ण होत नाही, असे म्हणत काँग्रेस नेतृत्वावर शिंदेंनी टीका केलीय.
'एक स्वप्न आम्ही पाहिलं होतं, जेव्हा 2018 मध्य प्रदेशमध्ये सरकार बनवलं होतं. पण, 18 महिन्यातंच सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. शेतकरी कर्जमाफी, बोनस, पिकविमा हे देण्यात आम्ही गेल्या 18 महिन्यात असफल ठरलोय, असे म्हणत मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेतृत्वाचं अपयश शिंदे यांनी सांगितलं. तसेच, मोदींचं कौतुक करताना, देशाच्या विकासासाठी मोदींमसमवेत काम करणार असल्याचे शिंदेंनी म्हटले.
काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. याचबरोबर 22 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठवून दिल्याने काँग्रेस अल्पमतात आली आहे. मात्र, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी कर्नाटकात असलेल्या 19 पैकी १३ आमदार काँग्रेसमध्ये परतणार असल्याचा दावा केला आहे. या आमदारांना शिंदे राज्यसभेसाठी उभे राहत असून त्यांना मत देण्यासाठी दुसरीकडे ठेवण्याचे सांगून नेण्यात आल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.