नवी दिल्ली : व्यापक बदलाची प्रक्रिया सुरू करताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने गांधी स्मृती, ललित कला अकादमी तसेच नेहरू स्मारक म्युझियम आणि वाचनालयासारख्या (एनएमएमएल) ३९ संस्थांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांमध्ये आधुनिक भारताचे चित्र आणि मोदी सरकारची छाप दिसून येईल, असे सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने जोरदार टीका केली. हा निर्णय या संस्थांचे स्वरूप बदलण्याचा डाव आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.ज्या उद्देशासाठी या संस्था स्थापन झाल्या तो उद्देश साध्य व्हावा. त्यांचे काम सुरळीत चालावे. त्यांच्या कामातून आधुनिक भारताचे चित्र दिसावे, हा त्यामागचा उद्देश आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, मॉडर्न आर्ट गॅलरी, साहित्य अकादमी, संगीत अकादमी, एनएसडी, व्हिक्टोरियल मेमोरियल यासारख्या प्रमुख सांस्कृतिक संघटनाही बदलाच्या प्रक्रियेतून जाणार आहेत.नावे बदलणार नाहीत! या संस्थांची नावेही बदलणार काय? यावर त्यांनी तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. नेहरू स्मारक म्युझियमचे पुनर्गठन करण्यामागे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंचे विचार आणि तत्त्वज्ञान डावलण्याचा हेतू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावर त्यांनी नेहरूंच्या विचाराचे महत्त्व कमी करण्याची कोणतीही योजना नाही, असे स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नेहरू स्मृती संग्रहालयाला नवे रुपडे
By admin | Published: September 02, 2015 11:31 PM